Sunday, October 16, 2011

सर आयझॅक न्यूटन - एक महामानव ( भाग- २ )


न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धाताप्रमाणे विश्वातली प्रत्येक वस्तू दुसरया प्रत्येक वस्तूकडे आकर्षिली जाते. हे आकर्षणाचे बल ( Force ) वस्तूचे वस्तुमान वाढत गेले तर त्याच्या सम प्रमाणात आणि त्यांच्यातले अंतर कमी होत गेले तर त्याच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात वाढत जाते हे त्याने मांडले , याच गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे फळ वरून खाली पडतं आणि ग्रहाही भ्रमण करतात !
न्यूटनने आपण एका पर्वतावर जाऊन बसलोय अशी कल्पना केली. तिथे बसून आपण एक दगड फेकला तर तो कुठेतरी पडेल. आणखी जास्त जोर लाऊन फेकला तर तो आणखी जास्त दूर जाऊन पडेल आणि त्यापेक्षाही आणखी जोर लावला तर आणखीनच दूर ! आणि यानंतर त्याच्या विचारांची झेप अफाट होती. आपण जर तो दगड खूपच प्रचंड जोरात फेकला तर तो कदाचित परतही येणार नाही ; ज्या वेगापेक्षा जास्त वेगाने तो दगड फेकला तर तो पृथ्वीपासून सटकून निघून जाईल , त्याला ' निस्त्न्याचा वेग ' किंवा मुक्तिवेग ( Escape Velocity ) असे म्हणतात. दगड फेक्ण्याकर्ता आपण जे बल वापरतो , त्यामुळे त्याला मिळणाऱ्या गतीमुळे तो पृथ्वीपासून दूर जातो आणि गुरुत्वाकार्षाणामुळे तो पृथ्वीकडे परत खेचला जातो. या दोन बलांपैकी कुठला मोठा यावर तो कसा जाईल म्हणजे पृथ्वीकडे परत येईल का पृथ्वीपासून दूर जाईल हे ठरेल. आणि जर हे दोन बल सारखे असतील तर तो दगड पृथ्वीपासून दूरही जाणार नाही आणि पृथ्वीकडे खेच्लाही जाणार नाही , तर तो दगड पृथ्वीभोवती एका कक्षेत चक्क फिरत बसेल! मग ग्रहांचे भ्रमण यामुळेच तर होत नाही ?
न्यूटन जेव्हा ग्रहतारे यांच्या हालचाली , अंतरे यांच्याविषयी निष्कर्ष काढण्यात गर्क होता तेव्हा त्याला गणित अपुरे पडायला लागले तेव्हा त्याने कलनशास्त्र ( Calculus ) हा गणिताप्रकार १६६५ - ६६ मध्ये विकसित केला .
यानंतर न्यूटनने प्रकाशावर संशोधन केले. लोलकातून बाहेर येणाऱ्या रंगाविषयी त्याने लिहिले , पण ते प्रकाशित मात्र केले नाही. पूर्वीच्या विज्ञान जगतावर अ‍ॅरिस्टॉटलचा खूपच प्रभाव होता.' प्रकाश हा एकजिनसी आहे' असे अ‍ॅरिस्टॉटल माने. न्यूटनने मात्र प्रकाश किरण लोलकातून सोडला तेव्हा त्याचे अनेक रंगात विभाजन झालेले होते , याचा अर्थ प्रकाश एकजिनसी नव्हताच मुळी !
१६८३ साली एकदा एडमंड हँली ( धुमकेतू फेम ), रोबर्ट हुक व ख्रिस्तोफर रेन हे एकदा रात्रीचे जेवण घेत बसले असताना ग्रहांचे भ्रमण कसं असतं आणि त्याचं कारण यावर चर्चा सुरु झाली. रेनने हे कारण शोधणाऱ्याला ४० शिलिंगचे बक्षीसही जाहीर केले.हुकने सवयीप्रमाणे उत्तर माहित असल्याचा दावा केला.
हँलीला हुकचा नक्षा उतरवायचा होता. तेव्हा तो न्यूटनकडे गेला. न्यूटनने ' ते ग्रह लंबवर्तुळाकार फिरतात आणि हे मी गणिताने सिद्ध केलंय, पण त्याचे कागद मिळत नाहीयेत' असे करून हँलीला फुटवले. खरे तर त्याचे कागद हरवलेले नव्हते, पण त्याला आपले संशोधन प्रकाशित करायला आवडत नसे. मग हुकची जिरवण्यासाठी हँली प्रयत्न करतोय हे कळल्यावर इतकी वर्षे लपून ठेवलेले संशोधन न्यूटनने प्रकाशित करायचे ठरवले.
प्रिन्सिपिया या ग्रंथाने विज्ञानाचा चेहरामोहराच बदलून गेला. लँटिन भाषेत लिहिलेले हे पुस्तक म्हणजे विज्ञानाच्या इतिहासातील सर्वोत्तम पुस्तक होते. त्याकाळी 'प्रिन्सिपिया' खूप कमी लोकांना कळले. न्यूटनने मुद्दामूनच हे पुस्तक अतिशय अवघड भाषेत व अवघड पद्धतीने लिहिले होते, आपले पुस्तक खूपच कमी लोकांना कळावे असे न्यूटनला वाटे. पण त्यानंतर त्याने लिहिलेले ' दि प्रोफेसीज' हे पुस्तक खूप लोकप्रिय झाले.
'प्रिन्सिपिया' मुले न्यूटन रॉयल सोसायटीचा अध्यक्ष बनला. १७०५ साली त्याला इंग्लंडची राणी 'अ‍ॅन' हिच्या हस्ते 'नाईटहूड' या सर्वोत्तम पुरस्कार व 'सर' या किताबाने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळविणारा तो पहिला वैज्ञानिक ठरला.
या सुमारास एक गमंतशीर गोष्ट घडली. न्यूटनने टाकसाळीत काम करायला सुरुवात केल्यावर त्याचा आता गणित आणि विज्ञानाची संबंध राहिला नव्हता, त्यामुळे 'न्यूटन आता संपलाय' अशीच सगळ्यांची समजूत झाली होती. पण जॉन बर्नोली या गणिततज्ञाने एक गणितातले अवघड कोडे जगातल्या सर्व गणितीयांना टाकले. न्यूटनने या अतिशय अवघड कोड्याचे उत्तर अवघ्या २ दिवसात सोडवून बर्नोलीकडे पाठवून दिले ते पाहून बर्नोली चाट पडला ' हे कोडे कोण सोडवेल हे मला माहित होते', हे तर मला वाघाचे पंजे दिसतायेत! असे उद्दगार बर्नोलीने काढले होते.
असा हा जगविख्यात संशोधक २० मार्च १७२७ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.

No comments:

Post a Comment