Tuesday, December 6, 2011

पुस्तक परिचयः फेलूदा(भाग-१)


पुस्तक: 
बादशहाची अंगठी
लेखक: 
सत्यजित रे \ अशोक जैन
प्रकाशक: 
रोहन प्रकाशन
सत्यजित रे हे नामवंत लेखक होते. त्यांनी बंगालीत लिहिलेल्या लघु कथा,लघु कादंबर्‍या,कविता आणि लेख मुलांच्या 'संदेश' या मासिकात १९६१ साली प्रसिद्ध होऊ लागल्यापासून ते प्रचंड लोकप्रिय झाले, त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांपैकी गुप्तहेर फेलूदा व शास्त्रज्ञ प्रोफेसर शंकू या साहित्यात अजरामर झाल्या आहेत व बंगाली जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसल्या आहेत.सुमारे १९९० साली फेलूदाच्या कथांचा अनुवाद गोपा मजूमदार यांनी इंग्रजीत केला.त्यानंतर २०१० साली पत्रकार अशोक जैन यांनी फेलूदाच्या निवडक १२ कथांचा संग्रह मराठीत अनुवादीत करुन मराठी रहस्यकथांसाठी एक नवे दालनच उघडले आहे.
त्या १२ कथांपैकी पहिल्या कथेचा परिचय मी आपल्याला सांगणार आहे.पहिल्या कथेचे नाव आहे 'बादशाहाची अंगठी' आणि हे नाव त्या कथानकाला अगदी योग्य आहे.
फेलूदा (प्रदोष मित्तिर ) व त्याचा किशोरवयीन सहाय्यक तोपशे हे तोपशेच्या बाबांच्या मित्राच्या (धीरुकाका) सांगण्यावरून लखनौ मध्ये सुट्टी घालवायला जातात.त्यानंतर धीरूकाकांच्या मित्राची अतिशय मौल्यवान मोगलकालीन अंगठी चोरीस जाते.त्या अंगठीचे मूल्य लाखोहून अधिक असते आणि विशेष म्हणजे ही अंगठी धीरूकाकांच्या घरुन चोरीस जाते.तेव्हा फेलूदा तपासाला सुरुवात करतो तेव्हा त्याला अनेक प्रकारची व विचित्र स्वभावाची माणसे भेटू लागतात, त्यात बनबिहारीबाबूंसारख्या अतिशय प्राणीवेड्या इसमाची फेलूदाबरोबर ओळ्ख होते आणि खर्‍या रहस्याला सुरुवात होते.त्यांनंतर अतिशय विचित्र गोष्टी घडण्यास सुरुवात होते,लखनौच्या भुलभुल्लयात तसेच अनेक ठिकाणी फेलूदावर खुनी हल्ले होतात पण दैवयोगाने तो यातून सुखरुप सुटतो. त्यानंतर फेलूदाला एका संन्याशाचा दाट संशय येउ लागतो पण जेव्हा त्या संन्याशाची खरी ओळख पटते व तो त्या अंगठीबद्दल सांगतो तेव्हा वाचक हादरून जाईल यात काहीच शंका नाही.त्यानंतर फेलूदा,तोपशे,तोपशे बाबा,संन्यासी व बनबिहारीबाबू हरिद्वारला जायचा बेत ठरवतात पण जाताना सुद्धा त्यांना रेल्वेमध्ये अतिशय रहस्यदायक अनुभव येतात यानंतर अखेर ते हरिद्वारला पोचतात तेव्हा गुन्हेगार लक्ष्मणझुल्याला जायचा बहाणा करुन फेलूदा व तोपशेचे अपहरण करतो तेव्हा फेलूदाला एका खडखड्या सापाशी सामना करावा लागतो मात्र फेलूदा यातून सुटतो व खरा गुन्हेगार पकडला जातो पण जेव्हा त्या अंगठीचा माग लागतो व एका खुनाची सुद्धा उकल होते तेव्हा आपण एक रहस्यकथा वाचतो आहे याचे वाचकाला समाधान वाटते.
'बादशहाची अंगठी' या कादंबरीत साहस्,रहस्य आणि गुंतागुंत याचे खिळवून टाकणारे एक उत्कंठावर्धक एक मिश्रण आहे.या कादंबरीचा शेवट जरी थोडाफार अपेक्षित असला तरी यातील रहस्य मात्र पूर्णपणे अनपेक्षित आहे.या
पुस्तकातील कथा चित्तथरारक व रोमांचकारी जरी असली तरी यात अकारण हिंसा (जॅकी चॅन स्टाईल्)अजिबात नाही.मात्र मूळ कथा बंगालीत असल्यामुळे थोडेसे बंगाली वातावरण आपल्याला दिसून येते तरीही मराठी वाचकांनी आवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे हे ११७ पानी पुस्तक कुठल्याही मराठी (वाचनप्रेमी) माणसाला कंटाळवाणे वाट्णार नाही याची मला खात्री आहे.
हे पुस्तक किंवा फेलूदाचा संपूर्ण संच विकत घ्यायचा असल्यास ( म्हण़जे पैसे द्यायची तयारी असल्यास ) खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.