Sunday, January 1, 2012

खगोलभ्रमंती: कृष्णविवरे (Black Holes) म्हणजे काय ?

 आज एक जानेवारी. २१ व्या शतकातील १२व्या वर्षाची सुरुवात. या शुभदिनी मी एका लेखनमालिकेचाश्रीगणेशा करण्यास जात आहे. सर्वप्रथम सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

   खगोलशास्त्र हा एक असा विषय आहे की, ज्याचा संपूर्ण अभ्यास करायचा म्हणटला तरी आपले संपूर्ण आयुष्य  कमीच पडेल.हा विषय दिसायला अतिशय सोपा वाटत असला तरी त्याचा अभ्यास करणे व खगोलज्ञान आत्मसात करणे हे इतके सोपे नाही.त्यामुळेच माझ्याजवळील तुटपुंजे खगोलज्ञान  मी आपल्याला 'खगोल भ्रमंती' या मालिकेतून देण्याचा प्रयत्न करणार आहे.या मालिकेत दर रविवारी एक असे लेख प्रकाशित होतील.जे या ब्लॉगचे सदस्य आहेत त्यांना हे लेख ई-मेलने पाठवण्यात येतील.आज या मालिकेचा शुभारंभ मी 'कृष्णविवरे'
या लेखाने करत आहे.
    'कृष्णविवरे' हा शब्द आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो पण 'कृष्णविवरे' म्हणजे नक्की काय ? ते कसे असतात ? इत्यादी प्रश्न आपल्याला पडत असतात. खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या 'A Brief history of time' या पुस्तकात तसेच डॉ.नारळीकरांनी 'आकाशाशी जडले नाते' या पुस्तकात 'ब्लॅक होल' विषयी लिहिले आहे.हे सर्व मी आपल्याला थोडक्यात पण समजावून सांगणार आहे.
     'कृष्णविवर' या संकल्पनेचा उगम अगदी अलिकडच्या काळातील आहे. खरेतर याविषयी संशोधन हे १७व्या शतकापासून चालू होते. मात्र या गोष्टीला अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन व्हीलर याने १९६९ मध्ये हे नाव सुचवले. पूर्वीच्या त्या काळी प्रकाशाचा वेग हा अनंत आहे,त्यामुळे गुरुत्वाकर्षण त्याचा वेग कमी करू शकणार नाही असे लोकांना वाटत होते.पण प्रकाशाचा वेग हा मर्यादित आहे हे रोमरने सिद्ध केले. त्यामुळे संशोधकांना गुरुत्वाकर्षणाचा परिणाम महत्त्वपूर्ण वाटू लागला. याच गोष्टीवर आधारीत एक शोधनिबंध, इंग्लिश संशोधक जॉन मिशेल याने १७८३ साली लंडन येथे प्रसिद्ध केला. त्यात त्याने असे माडले की, तारा भरपूर वस्तुमानाचा आणि भरीव असेल, तर त्याचे गुरुत्वाकर्षण क्षेत्र इतके प्रभावी असेल की प्रकाश त्यातून सुटू शकणार नाही म्हणजे ताऱ्याच्या पृष्ठभागावरून काही प्रकाश बाहेर पडलाच, तर तो फारसा पुढे जाण्याआधीच ताऱ्याचे गुरुत्वाकर्षण त्याला परत ओढून आणेल.या प्रकारचे तारे मोठया संख्येने असले पाहिजेत असा मिशेलचा प्रस्ताव  होता. यावरून कृष्णविवराची व्याख्या अशी करता येईल , ' ज्या वस्तूंचा प्रकाश आपल्यापर्यंत न पोचल्यामुळे जरी ते आपल्याला दिसले नाहीत तरी त्यांचे गुरुत्वाकर्षण आपल्याला जाणवते, अशा वस्तूंनाच 'कृष्णविवरे' असे म्हणतात.
      पण १९व्या शतकात लोकांना प्रकाश हा लहरींच्या स्वरूपात असतो असे वाटू लागले त्यामुळे मिशेलच्या या प्रस्तावाला काहीच अर्थ उरला नाही कारण प्रकाशलहरींवर गुरुत्वाकर्षणाचा काही परिणाम होत नाही असेसुद्धा भाकीत काही संशोधकांनी केले. मात्र या सर्व कल्पनांना आईनस्टाइनने १९१५ मध्ये व्यापक सापेक्षता सिद्धान्त मांडून पूर्णविराम दिला त्याचबरोबर प्रकाश हा लहारीस्वरूप व कणस्वरूपही असू शकतो हे संशोधकांना २०व्या शतकात कळले.मात्र तरीही मिशेलच्या या प्रस्तावाचा गंभीर विचार करायला बराच वेळ जावा लागला.
       मात्र १९२० पर्यंत 'कृष्णविवर कसे तयार होते' याची थोडीशी कल्पना यायला लागली होती. ते आता आपण बघुया.कृष्णविवर कसे तयार होते हे कळण्यासाठी प्रथम आपल्याला ताऱ्यांचे जीवनचक्र समजावून घेतले पाहिजे.एक विशाल वायुमेघ स्वत:च्याच गुरुत्वाकर्षणाखाली ढासळायला सुरुवात होऊन ताऱ्याचा जन्म होतो.तो जसजसा आकुंचन पावतो , तसतशा वायुतल्या अणूंच्या एकमेकांशी होणाऱ्या टकरी अधिकाधिक संख्येने आणि अधिक वेगाने होऊ लागतात आणि वायू तापत जातो.अखेरीस वायू इतका तापतो की हायड्रोजनचे अणू एकमेकांवर आदळताच ते अलग होईनासे होतात;उलट त्यांचे संघटन होऊन हेलियम तयार होतो.या प्रक्रियेत खूप उष्णता बाहेर पडते व त्यामुळेच तारा चकाकतो.या अतिरिक्त उष्णतेमुळेच वायूचा दाब  वाढत जाऊन अखेरीस गुरुत्वाकर्षणाच्या तोडीचा होतो आणि वायूचे आकुंचन थांबते.यानंतर काय होते हे समजण्यासाठी १९२८ पर्यंत वाट पाहावी लागली.
      एक भारतीय पदव्युत्तर विद्यार्थी व थोर संशोधक सी.व्ही.रमन यांचे नातलग एस.चंद्रशेखर १९२७ च्या अखेरीस केंब्रिजला व्यापक सापेक्षतेतील तज्ज्ञ ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिंग्टन यांच्या हाताखाली अभ्यास करायला निघाले.भारतातून निघाल्यानंतर समुद्र प्रवासात चंद्रशेखरने एक गणित केले - सर्व इंधन संपल्यानंतर आपल्याच गुरुत्वाकर्षणाखाली स्थिर राहण्यासाठी तारा कितपत मोठा असावा ? त्यांची कल्पना अशी होती; तारा लहान होतो तेव्हा त्यातले पदार्थकण एकमेकांच्या अतिशय जवळ येतात. त्यामुळे पाउलीच्या मनाई तत्त्वानुसार त्यांच्या गती अत्यंत वेगवेगळ्या असायला पाहिजेत.याचा परिणाम ते कण एकमेकांपासून दूर जाण्यात होतो, आणि मनाई तत्त्वानुसार होणारे प्रतिकर्षण या दोन्हीमध्ये समतोल साधून तारा स्वत: चे आकारमान टिकवून ठेवू शकतो. त्याच्या पूर्वायुष्यात गुरुत्वाकर्षण आणि उष्णता यात साधलेल्या समतोलासारखाच आहे.
       थोडक्यात, चंद्रशेखरच्या गणिताप्रमाणे सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४४ पटीपेक्षा जास्त वस्तुमानाचा थंड झालेला तारा, स्वत:च्याच गुरुत्वाकर्षणाखाली टिकाव धरू शकणार नाही.या वस्तुमानालाच 'चंद्रशेखर मर्यादा'
असे म्हणतात.या कल्पनेवर स्टीफन हॉकिंग यांनी सुमारे चार पाने लिहिली आहेत.ताऱ्याची आणखीही एक अंतिम स्थिती असू शकते,असे लॅन्डॉवने सिद्ध केले. या अंतिम स्थितीचा संबंध न्यूट्रॉन व प्रोटॉन यांच्यातला 
प्रतिकर्षणाशी असतो. म्हणून त्यांना 'न्यूट्रॉन' तारे असे म्हणण्यात आले. १९६०च्या दशकात कृष्णविवराची व्याख्या करण्यात आली ती अशी की- सापेक्षता सिद्धांतानुसार प्रकशपेक्षा जास्त वेगाने काहीच जाऊ शकत नाही तेव्हा जिथून प्रकाशच बाहेर पडणे शक्य नाही तिथून दुसरे काहीच बाहेर पडू शकत नाही म्हणून एक घटनासमुच्च्य म्हणजेच अवकाश काळाचा एक विभाग असा निर्माण होतो की तिथून निघून दूरच्या निरिक्षकाकडे पोचणे शक्यच नाही.या विभागाला आता आपण कृष्णविवर असे संबोधतो.


      बास, आता मी थांबतो या विषयावर अजून एक लेख लिहील म्हणतो.लेख आवडला का ? प्रतिक्रिया जरूर कळवा.हो, आणि एखाद्या संज्ञेचे स्पष्टीकरण हवे असल्यास ते पण सांगा.


Tuesday, December 6, 2011

पुस्तक परिचयः फेलूदा(भाग-१)


पुस्तक: 
बादशहाची अंगठी
लेखक: 
सत्यजित रे \ अशोक जैन
प्रकाशक: 
रोहन प्रकाशन
सत्यजित रे हे नामवंत लेखक होते. त्यांनी बंगालीत लिहिलेल्या लघु कथा,लघु कादंबर्‍या,कविता आणि लेख मुलांच्या 'संदेश' या मासिकात १९६१ साली प्रसिद्ध होऊ लागल्यापासून ते प्रचंड लोकप्रिय झाले, त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखांपैकी गुप्तहेर फेलूदा व शास्त्रज्ञ प्रोफेसर शंकू या साहित्यात अजरामर झाल्या आहेत व बंगाली जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसल्या आहेत.सुमारे १९९० साली फेलूदाच्या कथांचा अनुवाद गोपा मजूमदार यांनी इंग्रजीत केला.त्यानंतर २०१० साली पत्रकार अशोक जैन यांनी फेलूदाच्या निवडक १२ कथांचा संग्रह मराठीत अनुवादीत करुन मराठी रहस्यकथांसाठी एक नवे दालनच उघडले आहे.
त्या १२ कथांपैकी पहिल्या कथेचा परिचय मी आपल्याला सांगणार आहे.पहिल्या कथेचे नाव आहे 'बादशाहाची अंगठी' आणि हे नाव त्या कथानकाला अगदी योग्य आहे.
फेलूदा (प्रदोष मित्तिर ) व त्याचा किशोरवयीन सहाय्यक तोपशे हे तोपशेच्या बाबांच्या मित्राच्या (धीरुकाका) सांगण्यावरून लखनौ मध्ये सुट्टी घालवायला जातात.त्यानंतर धीरूकाकांच्या मित्राची अतिशय मौल्यवान मोगलकालीन अंगठी चोरीस जाते.त्या अंगठीचे मूल्य लाखोहून अधिक असते आणि विशेष म्हणजे ही अंगठी धीरूकाकांच्या घरुन चोरीस जाते.तेव्हा फेलूदा तपासाला सुरुवात करतो तेव्हा त्याला अनेक प्रकारची व विचित्र स्वभावाची माणसे भेटू लागतात, त्यात बनबिहारीबाबूंसारख्या अतिशय प्राणीवेड्या इसमाची फेलूदाबरोबर ओळ्ख होते आणि खर्‍या रहस्याला सुरुवात होते.त्यांनंतर अतिशय विचित्र गोष्टी घडण्यास सुरुवात होते,लखनौच्या भुलभुल्लयात तसेच अनेक ठिकाणी फेलूदावर खुनी हल्ले होतात पण दैवयोगाने तो यातून सुखरुप सुटतो. त्यानंतर फेलूदाला एका संन्याशाचा दाट संशय येउ लागतो पण जेव्हा त्या संन्याशाची खरी ओळख पटते व तो त्या अंगठीबद्दल सांगतो तेव्हा वाचक हादरून जाईल यात काहीच शंका नाही.त्यानंतर फेलूदा,तोपशे,तोपशे बाबा,संन्यासी व बनबिहारीबाबू हरिद्वारला जायचा बेत ठरवतात पण जाताना सुद्धा त्यांना रेल्वेमध्ये अतिशय रहस्यदायक अनुभव येतात यानंतर अखेर ते हरिद्वारला पोचतात तेव्हा गुन्हेगार लक्ष्मणझुल्याला जायचा बहाणा करुन फेलूदा व तोपशेचे अपहरण करतो तेव्हा फेलूदाला एका खडखड्या सापाशी सामना करावा लागतो मात्र फेलूदा यातून सुटतो व खरा गुन्हेगार पकडला जातो पण जेव्हा त्या अंगठीचा माग लागतो व एका खुनाची सुद्धा उकल होते तेव्हा आपण एक रहस्यकथा वाचतो आहे याचे वाचकाला समाधान वाटते.
'बादशहाची अंगठी' या कादंबरीत साहस्,रहस्य आणि गुंतागुंत याचे खिळवून टाकणारे एक उत्कंठावर्धक एक मिश्रण आहे.या कादंबरीचा शेवट जरी थोडाफार अपेक्षित असला तरी यातील रहस्य मात्र पूर्णपणे अनपेक्षित आहे.या
पुस्तकातील कथा चित्तथरारक व रोमांचकारी जरी असली तरी यात अकारण हिंसा (जॅकी चॅन स्टाईल्)अजिबात नाही.मात्र मूळ कथा बंगालीत असल्यामुळे थोडेसे बंगाली वातावरण आपल्याला दिसून येते तरीही मराठी वाचकांनी आवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे हे ११७ पानी पुस्तक कुठल्याही मराठी (वाचनप्रेमी) माणसाला कंटाळवाणे वाट्णार नाही याची मला खात्री आहे.
हे पुस्तक किंवा फेलूदाचा संपूर्ण संच विकत घ्यायचा असल्यास ( म्हण़जे पैसे द्यायची तयारी असल्यास ) खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Saturday, November 12, 2011

सर्वात वेगवान फिरणारा तारा !


आपला सूर्य दर सेकंदाला २ किलोमीटर इतक्या वेगात फिरतो,जो वेग अतिशय वेगवान आहे.पण
अ‍ॅस्ट्रोफिजिकल जनरल मध्ये प्रकाशित केलेल्या एका संशोधनाने सूर्यापेक्षाही वेगात फिरणार्‍या व
१,६०,००० प्रकाशवर्षे दूर अशा एका एका तार्‍याचा अभ्यास केला आहे.जो तारा एका सेकंदाला सुमारे
६०० किमी इतक्या वेगात फिरू शकतो.
ScienceMag.org वर केन क्रॉसेलने यावर सविस्तर लिहिले आहे.त्याच्याअनुसार याच वेगाचे एखादे
 विमान असेल तर ते अमेरिकेला फक्त ७ सेकंदात फेरी मारू शकेल.अजून यावर सविस्तर माहिती
यायची  आहे तसे होताच मी आपल्यापर्यंत अजून माहिती पोहचवेल.तूर्तास खाली लिंक दिल्या आहेत.

Thursday, October 27, 2011

रा.वनःएक अपेक्षाभंग


सर्वप्रथम मी देशपांडेंची* क्षमा मागत आहे पण हे एक परीक्षण नाहीये मी तो चित्रपट अजून पाहिलेला नाही तरी मी जी काही परीक्षणे वाचली आहेत त्यावरून मला चित्रपटाची कल्पना आली आहे त्याचबद्दल मी तुम्हाला सांगत आहे त्यावरून हा चित्रपट पाहायचा की नाही हे तुम्ही ठरवा.

रा.वन ला प्रेक्षकांनी जरी उचलून धरले असले तरी विविध संकेतस्थळांनी व प्रसारमाध्यमांनी रा.वन ला 'बरा'असाच शेरा दिलाय.

रा.वन ला विविध संकेतस्थळांनी दिलेल्या प्रतिकिया:
तुमची जर या चित्रपटाकडून काहीच अपेक्षा नसेल तर हा चित्रपट बरा आहे पण जर तुम्ही मनात अपेक्षा ठेवून बघायला
जाणार असाल तर हा चित्रपत फाल्तू आहे.याच्यासाठी एक स्टार पण नाही.
कुणाल गुहा,याहू इंडिया
(http://in.movies.yahoo.com/blogs/movie-reviews/r-one-review-000920615.html)
हा चित्रपट डोके बाजूला करून पाहण्यासारखा आहे,हा चित्रपट जरूर पाहा पण पाहण्याआधी १० वेळा विचार करा.
द वॉल स्ट्रीट
चित्रपट चांगला आहे पण सर्वोत्तम नक्कीच नाही यापेक्षाही चांगले सादरीकरण जमले असते पण एकदा बघायला काहीच हरकत नाही.
जे हर्टाडो,ट्विच
तीसरी प्रतिकिया फक्त बरी आहे पण ती भारताबाहेरच्या व्यक्तीने केली आहे.
रा.वन हा चित्रपट बरा घर पो़कळ वासा आहे,रा.वन हा प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करतो केवळ शाहरूखासाठी जे चाहते हा
चित्रपट पाहणार असतील त्यांची निराशा होणार नाही. दर्जा:***
अनिरुद्ध गुहा, डीएनए
(http://www.dnaindia.com/entertainment/review_aniruddha-guha-reviews-ra-o...)
रा.वन या चित्रपटातील सुपर्हीरो क्रिशपेक्षा सरस आहे पण 'रोबोट'(रजनीकांत्)पेक्षा अजिबात नाही.रा.वन हा चित्रपट तंत्रज्ञानामध्ये रोबोट पुढे फोल ठरला आहे.
टाईम्स ऑफ इंडिया
(timesofindia.indiatimes.com › Entertainment › Bollywood)
बास मी तुम्हाला फक्त परिक्षणे वाचून तुम्हाला कंटाळा नाही आणणार आता फक्त एकच!
रा.वन हे शाहरूखचे सर्वात महागडे संकट आहे हा चित्रपट सादरीकरणात अयशस्वी ठरला आहे. दर्जा:**
रेडिफ.कॉम
(http://www.rediff.com/movies/review/review-raone-abhishek-mande/20111026...)
सगळे सांगत बसलो तर काही खरे नाही त्यामुळे येथेच थांबतो यांवरुन ठरवा काय ते!!!!
फक्त जाता जाता http://www.hindustantimes.com/Critics-verdict-RA-One-gets-mixed-reviews/... यावरील बातमी जरूर वाचावी.


देशपांडे हे एक मी मराठीवरील एक सदस्य आहेत त्याचबरोबर लेखकसुद्धा मी मराठीवरील सदस्य असून ते तिथे लिखाण करतात.

Sunday, October 16, 2011

प्रकाशाचा वेग: एक चिंतन

न्यूटनंतर लोकांना वाटू लागले'न्यूटन हा सर्वश्रेष्ठ संशोधक आहे,'पण अल्बर्ट आईनस्टाइनच्या संशोधनामुळे व त्याने मांडलेल्या सिद्दातांने न्यूटनचे काही संशोधन मोडित काढले. तेव्हा वाटु लागले आईनस्टाइनचे संशोधन खोडुन काढणे अशक्य आहे. पण ज्याप्रमाणे विक्रम हे मोडण्यासाठीच असतात त्याप्रमाणे संशोधनसुध्दा नवीन संशोधन करण्यासाठीच असते पण म्हणुन पहिले संशोधन किंवा पहिला संशोधक मूर्ख ठरत नाही ज्याप्रमाणे सचिन व ब्रॅडमन यामध्ये श्रेष्ठ कोण? असा प्रश्न कोणी मला विचारते तेव्हा मी तरी असे उत्तर त्याला देतो की 'दोघेही आपापल्या काळात श्रेष्ठ आहेत कोणी नीच नाही तर कोणी उच्च नाही' हेच न्युटन व आईनस्टाइनबद्द्ल किंवा इतर संशोधकांबद्दल आहे. त्यामुळे कुठल्याही संशोधकांची तुलना करु नये केल्यास ती काळानुरुप करावी, असो मी काय उगीच माझी टहाळकी सांगत बसलो मुळ मुद्दा राहिला बाजूला.
नुकतेच सर्न येथील संशोधकांनी आईनस्टाइनच्या एका सिद्धांताला आव्हान दिले, मी मुद्दामच 'आव्हान' हा शब्द वापरला आहे कारण ते आव्हान अजून सिद्ध झालेले नाही पण ते सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे.१९०५ मध्ये आईनस्टाइनने त्याच्या सापेक्षतावादानुसार काही नियम मांडले त्यानुसार प्रकाशाचा वेग हा स्थिर आहे तसेच या विश्वात कुठल्याही इतर भौतिक गोष्टींपेक्षा प्रकाशाचा वेग हा सर्वोच्च आहे, असे त्याचे म्हणणे होते. पण त्याआधी सुद्धा काही संशोधकांनी हे म्हणणे मांडले होते. त्यामुळे जवळजवळ आतापर्यंत लहान मुलानांही महित होते की प्रकाशाचा वेग सर्वोच्च आहे त्यामुळे विश्वातील मोठी अंतरे मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे परिमाण अस्तित्वात आले. पण २३ सप्टेंबर २०११ रोजी सर्न येथील संशोधकांनी जग हादरुन टाकले, त्यांना एक वेगळीच गोष्ट कळाली. अलीकडे व शोध लागलेल्या 'न्यूट्रिनोंन्स' या अतिसूक्ष्म कणांचा अभ्यास करण्यासाठी व त्याचा वेग मोजण्यासाठी 'Opera' या प्रकल्पासाठी सुमारे ५० संशोधक कार्यरत होते. २३ सप्टेंबर या दिवशी त्यांनी हे अतिसूक्ष्म कण सर्न ( स्वित्झर्लंड ) पासून ग्रान सासो ( इटली ) पर्यंत सोड्ले आणि चक्क या कणांना हे अंतर कापायला प्रकाशापेक्षा ६० नॅनोसेकंद कमी लागले, तेसुद्धा या कणांचा मार्गात भुगर्भाच्या एका पापूद्र्यासारखे घन पदार्थही होते.त्यामुळे कदाचित त्यांचा वेग मंदावला असू शकेल.

 सर्न संस्थेचा दावा : न्यूट्रीनो हे प्रकाशापेक्षा अधिक वेगाने प्रवास करतात.
मी मराठी या संकेतस्थळावरील चर्चेनंतर काही ठळक मुद्दे समोर आले व माझ्या ज्ञानात भर पडली ते सर्व मुद्दे मी पुढे मांडले आहेत.

प्रकाशाचा वेग १ सेकंदाला : २९,९७,९२,४५८ मीटर आहे.
न्यूट्रीनोचा वेग १ सेकंदाला : ३०,००,०६,००० मीटर आहे. (सर्न संस्थेच्या दाव्याप्रमाणे)

थोडक्यात न्यूट्रिनोचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा ६ किलोमीटर प्रतिसेकंदाने जास्त आहे.

विज्ञानाची प्रगती ही नित्यनेमाने होणार्‍या संशोधनावर अवलंबून असते. त्याप्रमाणे ती व्हावी देखील.
माझ्यामते न्यूट्रीनोबद्दलचा सर्न संस्थेचा दावा थोडा घाईत प्रसिद्ध झाला आहे. ३ वर्षांचा कालावधी त्यांनी सर्व बाबी तपासण्यात दिल्या होत्या असे सांगितले जात आहे. सर्न चे निष्कर्ष काही प्रमाणात बरोबर असले तरी देखील काही बाबींचा विचार करणे आवश्यक ठरते, त्या पाहूयात. आणि न्यूट्रीनोजवरचे परिक्षण हे गेल्या ६ महिन्यांतले आहे.
फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर असलेल्या 'सर्न'च्या आवारातून तेथील शास्त्रज्ञांनी एका किरणपुंजाच्या साहाय्याने अब्जावधी न्यूट्रिनोजचा ७३० कि. मी. अंतरावर असलेल्या इटलीतील ग्रॅन सासो प्रयोगशाळेच्या दिशेने मारा केला. एवढे अंतर गाठण्यास प्रकाशाला २.३ मिलिसेकंद इतका वेळ लागला. तर न्यूट्रिनोज त्यापेक्षा ६० नॅनोसेकंद आधीच पोहोचले असा तो प्रयोग आहे.
१. मुख्य म्हणजे न्यूट्रीनो कणांवर पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षणाचा प्रभाव होतो की नाही हे अजून माहिती नाहिये.
२. प्रकाशाच्या तेजस्वितेमुळे प्रकाशाच्या वेगात फरक पडतो पण तो केवळ ६ मिलीमीटर प्रतिसेकंद असल्यामुळे तो नगण्य मानला जातो. (न्यूट्रिनोज हे अणुचे कोणताही विद्युत प्रभार नसलेले कण आहेत. ते इतके सूक्ष्म आहेत की त्यांना वस्तुमान असल्याचा शोधही अलिकडेच लागलेला आहे. त्यामुळे न्यूट्रिनोज चा असा वेगावर परिणाम करणारा गुणधर्म शोधण्यासाठी अजून संशोधन व्हायचे आहे)
थोडे प्रकाशाच्या वेगाचा इतिहास पाहूयात.
प्रकाशाच्या वेगाचं प्रत्यक्ष मापन हे सर्वप्रथम इ.स. १८४९ साली फिजॉ या फ्रेंच शास्त्रज्ञाने केलं. त्याने केलेले मापन हे आजच्या अचूक मापनापेक्षा ४ टक्क्यांनी अधिक होते. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रयोगांच्या साहाय्याने त्यातील त्रुटी दूर करण्यात हातभार लावला व आजचा अचूक आकडा आपल्यापुढे उपलब्ध आहे. न्यूट्रीनोज वरच्या संशोधनाला अजून तो टप्पा पार करायचा आहे. त्यामुळे यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही. किंवा या संशोधनाचा अवकाशातील प्रवासासाठी काही उपयोग आत्ता तरी होणार नाहिये.
कारण न्यूट्रीनोज च्या वस्तुमानावर सूर्याचा प्रभाव पडून काही परिणाम होतो का नाही?
अवकाशाच्या निर्वात पोकळीत न्यूट्रीनोजचे वागणे कसे असेल?
गुरुत्त्वीय बलामुळे न्यूट्रीनोज वर काही प्रभाव पडतो की नाही?
हे सर्व प्रयोग करण्यासाठी शास्त्रज्ञांना वेळ लागेलच.
पण चाकोरीबाहेरील शोध प्रसिद्ध केल्याबद्दल 'सर्न' चे वैज्ञानिक कौतुकास पात्र आहेत असे नक्कीच म्हणेन. सर्न संस्थेचे निष्कर्ष हे न्यूट्रिनो कण प्रकाशापेक्षा अधिक वेगवान आहेत किंवा नाही या संशोधनाची सुरुवात मात्र आहे असे मला वाटते.
या  लेखासाठी मला मी मराठी (mimarathi .net )या संकेतस्थळावरील सागरने अतिशय मदत केली त्याबद्दल धन्यवाद!!!

किरणोत्सर्ग संशोधनातील एक महानायिका

आपल्या शोधांनी विज्ञानाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या व दोन नोबेल पारितोषिके जिंकणाऱ्या मारी क्युरी या कर्तबगार स्त्रीचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ रोजी वॉर्सा ( पोलंड ) येथे झाला. तिचे वडील विज्ञान आणि गणित शिकवत तर आई पियानो वाजवत. मेरी क्युरीचे मुळ नाव मान्या स्क्लोडोव्ह्स्का.
पाच वर्षे नोकरी करून मान्याने आपल्या बहिणीला ब्रोन्याला शिकविले व नंतर स्वत: फ्रान्समध्ये जाऊन शिकली. त्यात अवघ्या सतराव्या वर्षी झालेल्या प्रेम- भंगामुले ती मनातून खचली होती. पण विज्ञानाच्या सुदैवाने, विज्ञानाच्या प्रेमाने तिला वाचवले.
त्यानंतर पॅरिसच्या प्रयोगशाळेत तिची भेट पेरी क्युरीशी झाली. तो त्यावेळी त्याच्या भावाबरोबर 'स्फटिक' ( क्रिस्टल ) हा खूप दाबाखाली वीज कशी निर्माण करतो, यावर संशोधन करत होता. लवकरच या दोघांचे प्रेम जमले आणि हे दोघे २६ जुलै १८९५ रोजी विवाहबद्ध झाले. याचवेळी बेह्क्रेलला युरेनियमच्या क्षारातून कसलेतरी उत्सर्जन ( Radiation ) होतंय असं आढळले होते आणि त्यावर संशोधन करायला मेरीला पाचारण केले होते. मेरीने हेन्री बेह्क्रेलबरोबर युरेनियम क्षारातून निघणाऱ्या त्या गूढ उत्सर्जनावर काम करायला सुरुवात केली.पेरी ( प्येर ) व मारी ( मेरी ) हि एक अफलातून जोडी होती. प्येर अतिशय खोडकर व खटयाळ होता, तर मेरी अतिशय शांत व गंभीर स्वभावाची होती.
या प्रयोगात प्येरही मेरीला मदत करत असे. आता क्युरी दांपत्याने शास्त्राच्या इतिहासात एका प्रचंड मोठया प्रयोगाला सुरुवात केली होती. यासाठी प्रचंड परिश्रम व चिकाटीची गरज होती. युरेनियम ऑक्साईड असलेला पिंचब्लेंड क्षार उकळवून क्युरी दांपत्याने त्याचे शुद्धीकरण करण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यांना तासनतास लोखंडी स्टोव्ह्समोर बसावे लागे. जेव्हा त्यांना त्या जालामुळे घुसमटायला होई तेव्हा ते आपली जागा बदलत असत.
या काळातच मेरीला 'न्युमोनिया' झाला. पण प्येर मात्र त्या घरगुती भट्टीत बसून काम करतच राहिला. या भानगडीत मेरीचे वजन सात किलोने घटले ! मेरी मात्र एवढी निश्चयी होती की तिनेच प्येरला प्रयोगात कधीही हर न मानता सतत पुढे चालू राहण्याविषयी प्रवृत्त केलं.
१८९७ साली मेरीने आयरिन या मुलीला जन्म दिला. बाळंतपणानंतर १० दिवसातच ती कामाला लागली. दोन वर्ष ही 'ढवळाढवळ' केल्यावर त्यांना अगदी थोडासा ' बिसमथ' संयुगाचा गाळ मिळाला. मेरीला वाटले की या गाळात नक्कीच एक नवीन पदार्थ असला पाहिजे. तिने त्यावर मग प्रयोग करायला सुरुवात केली. शेवटी तिला तो पदार्थ मिळाला. त्या नवीन मिळविलेल्या मूलद्रव्याचे नाव तिने आपल्या मायदेशावरून 'पोलोनियम' असे ठेवले. तिने या मूलद्रव्याला स्वत:चे, पतीचे व इतर कुठल्याही नातलगाचे नाव न देता आपल्या देशाचे पोलंडचे नाव देऊन आपल्या देशाबद्दलाचा अभिमान जागवला. आता त्या गाळातून 'पोलोनियम' वेगळे काढल्यावरही जे पदार्थ उरत होते त्यावर प्रयोग करण्याची गरज होती. त्यातही काहीतरी सापडेल असे मेरीला वाटत होते.
उरलेल्या गाळाचे शुद्धीकरण आणि स्फटिकीकरण त्यांनी चालूच ठेवले. अतोनात परिश्रमानंतर शेवटी त्यांना त्यातूनच आणखी एक मूलद्रव्य सापडले. आणि बेह्क्रेलला पडलेले कोडे एकदमच सुटले. या नवीन मूलद्रव्याचे नाव त्यांनी 'रेडियम' असे ठेवले. रेडियम अतिशय विचित्र प्रकारचे मूलद्रव्य होते. युरेनियमच्या ते दहा लाख पटीने रेडिओअ‍ॅक्टीव होते. रेडियम काळ्या कागदात गुंडाळले तरी ते आजूबाजूच्या पदार्थांवर परिणाम करायचे. त्यापासून निघणारे किरण, जंतूच नव्हे तर वनस्पती, प्राणी यांचाही नाश करू शकायचे. ते पेशी नष्ट करू शकल्यामुळे त्यांचा कर्करोग उपचारासाठी उपयोग होईल असे वाटायला लागले आणि तसेच झाले.त्यावेळी रेडियमची किंमत दर ग्रमला ७० लाख रुपये होती. मेरी क्यूरीने आपल्या या शोधाबद्दल अर्जही केला नाही. रेडियममधून सतत उर्जा बाहेर पडत असते. बाहेरुन प्रकाश किंवा अन्य मार्गाने उर्जा न मिळ्ताही ही उर्जा कशी बाहेर पड़ते याचे कोडे बरेच दिवस संशोधकांना पडले होते. शेवटी आइनस्टाइनने ते सोडवले रेडियमच्या वस्तुमानाचे ( m ) उर्जेत ( E ) प्रसिध्द समीकरणाप्रमाणे E = mc^2 रुपान्तर होत होते. यालाच 'रेडिओअ‍ॅक्टिव्हिटी' म्हणतात.
युरेनियममधून होणारया किरणोस्त्र्गातून खरेतर तीन प्रकारचे किरण मिळाले होते.काही किरण चुबक्त्वामुळे एका दिशेला वळत होते. रदरफोर्डने त्यातल्या घन ( + ) विद्युत्भार असणारया किरणांना 'अल्फा रेज' असे नाव दिले होते , तर निगेटिव्ह विद्युत्भार असणारया किरणांना 'बीटा रेज' असे नाव दिले गेले. किरण हे कणांनी बनले आहेत असे मानून त्यांतल्या कणांना संशोधक मग 'अल्फा कण' व 'बीटा कण' म्हणू लागले. त्यानंतर पौल विलार्ड याने चुबक्त्वामुळे दिशा न बदलणारे व आरपार जाणारे किरण शोधले आणि त्यांना 'Gamma rays' असे नाव दिले. नंतर रदरफोर्डने यावर संशोधन करून व 'किरणोत्सारी डीके' वापरून पृथ्वीचे वय काढले.
मेरीचे संशोधन जगभरात प्रसिद्ध झाले. नोबेल कमिटीने मेरीच्या संशोधनाला मान देत तिला, बेह्क्रेलला व पेरीला नोबेल पारितोषिक दिले. ती हे पारितोषिक मिळवणारी पहिली स्त्रीसुद्धा ठरली. तिच्यानंतर ३५ वर्षे तरी कुठल्याही स्त्रीला नोबेल मिळाला नाही.त्यानंतर दहा वर्षांनी तिला पुन्हा नोबेल मिळाले. दोन नोबेल पारितोषिके मिळवणारी स्त्री अजूनतरी ( म्हणजे मेरीनंतर ) झालेली नाही.
त्यानंतर अचानक पेरीच्या अपघाती मृत्युमुळे मेरी मनातुन फारच खचली. त्यानंतर लोकांनी तिच्यावर अनेक खोटे आरोप केले, त्यामुळे ती सायन्स परिषेदेवर निवडून जाऊ शकली नाही. तिने फ्रान्स मध्ये 'रेडियम संस्था' स्थापन केली व पहिल्या महायुद्धात एक्स - रे वाहनांची निर्मिती करुन हजारो सैनिकांचे प्राण वाचविले.
पण मेरीने शोधलेले रेडियम हे किती धोकादायक आहे, हे लोकांनाच काय खुद्द मेरीलाच माहित नव्हते. ती खुशाल रेडियमची ट्युब खिशात घेउन फिरत असे , शेवटी होयचे तेच घडल़े किरणोस्तारामुळे मेरीला 'ल्युकोमिया' झाला व तिचा ४ जुलाई १९३४ रोजी मृत्यु झाला.
मेरी क्युरी तिच्या साधेपणा, मानवतावाद आणि विज्ञानाबद्दलची ओढ यामुळे विज्ञानाच्या दुनियेत अमर झाली. पुढे मेरीच्या मुलींनी आईचे संशोधन चालु ठेवले व १९३५ मध्ये तिची मुलगी आयरिन व तिचा नवरा जोलिएट याने नोबेल मिळविले.

सर आयझॅक न्यूटन - एक महामानव ( भाग- २ )


न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धाताप्रमाणे विश्वातली प्रत्येक वस्तू दुसरया प्रत्येक वस्तूकडे आकर्षिली जाते. हे आकर्षणाचे बल ( Force ) वस्तूचे वस्तुमान वाढत गेले तर त्याच्या सम प्रमाणात आणि त्यांच्यातले अंतर कमी होत गेले तर त्याच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात वाढत जाते हे त्याने मांडले , याच गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे फळ वरून खाली पडतं आणि ग्रहाही भ्रमण करतात !
न्यूटनने आपण एका पर्वतावर जाऊन बसलोय अशी कल्पना केली. तिथे बसून आपण एक दगड फेकला तर तो कुठेतरी पडेल. आणखी जास्त जोर लाऊन फेकला तर तो आणखी जास्त दूर जाऊन पडेल आणि त्यापेक्षाही आणखी जोर लावला तर आणखीनच दूर ! आणि यानंतर त्याच्या विचारांची झेप अफाट होती. आपण जर तो दगड खूपच प्रचंड जोरात फेकला तर तो कदाचित परतही येणार नाही ; ज्या वेगापेक्षा जास्त वेगाने तो दगड फेकला तर तो पृथ्वीपासून सटकून निघून जाईल , त्याला ' निस्त्न्याचा वेग ' किंवा मुक्तिवेग ( Escape Velocity ) असे म्हणतात. दगड फेक्ण्याकर्ता आपण जे बल वापरतो , त्यामुळे त्याला मिळणाऱ्या गतीमुळे तो पृथ्वीपासून दूर जातो आणि गुरुत्वाकार्षाणामुळे तो पृथ्वीकडे परत खेचला जातो. या दोन बलांपैकी कुठला मोठा यावर तो कसा जाईल म्हणजे पृथ्वीकडे परत येईल का पृथ्वीपासून दूर जाईल हे ठरेल. आणि जर हे दोन बल सारखे असतील तर तो दगड पृथ्वीपासून दूरही जाणार नाही आणि पृथ्वीकडे खेच्लाही जाणार नाही , तर तो दगड पृथ्वीभोवती एका कक्षेत चक्क फिरत बसेल! मग ग्रहांचे भ्रमण यामुळेच तर होत नाही ?
न्यूटन जेव्हा ग्रहतारे यांच्या हालचाली , अंतरे यांच्याविषयी निष्कर्ष काढण्यात गर्क होता तेव्हा त्याला गणित अपुरे पडायला लागले तेव्हा त्याने कलनशास्त्र ( Calculus ) हा गणिताप्रकार १६६५ - ६६ मध्ये विकसित केला .
यानंतर न्यूटनने प्रकाशावर संशोधन केले. लोलकातून बाहेर येणाऱ्या रंगाविषयी त्याने लिहिले , पण ते प्रकाशित मात्र केले नाही. पूर्वीच्या विज्ञान जगतावर अ‍ॅरिस्टॉटलचा खूपच प्रभाव होता.' प्रकाश हा एकजिनसी आहे' असे अ‍ॅरिस्टॉटल माने. न्यूटनने मात्र प्रकाश किरण लोलकातून सोडला तेव्हा त्याचे अनेक रंगात विभाजन झालेले होते , याचा अर्थ प्रकाश एकजिनसी नव्हताच मुळी !
१६८३ साली एकदा एडमंड हँली ( धुमकेतू फेम ), रोबर्ट हुक व ख्रिस्तोफर रेन हे एकदा रात्रीचे जेवण घेत बसले असताना ग्रहांचे भ्रमण कसं असतं आणि त्याचं कारण यावर चर्चा सुरु झाली. रेनने हे कारण शोधणाऱ्याला ४० शिलिंगचे बक्षीसही जाहीर केले.हुकने सवयीप्रमाणे उत्तर माहित असल्याचा दावा केला.
हँलीला हुकचा नक्षा उतरवायचा होता. तेव्हा तो न्यूटनकडे गेला. न्यूटनने ' ते ग्रह लंबवर्तुळाकार फिरतात आणि हे मी गणिताने सिद्ध केलंय, पण त्याचे कागद मिळत नाहीयेत' असे करून हँलीला फुटवले. खरे तर त्याचे कागद हरवलेले नव्हते, पण त्याला आपले संशोधन प्रकाशित करायला आवडत नसे. मग हुकची जिरवण्यासाठी हँली प्रयत्न करतोय हे कळल्यावर इतकी वर्षे लपून ठेवलेले संशोधन न्यूटनने प्रकाशित करायचे ठरवले.
प्रिन्सिपिया या ग्रंथाने विज्ञानाचा चेहरामोहराच बदलून गेला. लँटिन भाषेत लिहिलेले हे पुस्तक म्हणजे विज्ञानाच्या इतिहासातील सर्वोत्तम पुस्तक होते. त्याकाळी 'प्रिन्सिपिया' खूप कमी लोकांना कळले. न्यूटनने मुद्दामूनच हे पुस्तक अतिशय अवघड भाषेत व अवघड पद्धतीने लिहिले होते, आपले पुस्तक खूपच कमी लोकांना कळावे असे न्यूटनला वाटे. पण त्यानंतर त्याने लिहिलेले ' दि प्रोफेसीज' हे पुस्तक खूप लोकप्रिय झाले.
'प्रिन्सिपिया' मुले न्यूटन रॉयल सोसायटीचा अध्यक्ष बनला. १७०५ साली त्याला इंग्लंडची राणी 'अ‍ॅन' हिच्या हस्ते 'नाईटहूड' या सर्वोत्तम पुरस्कार व 'सर' या किताबाने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळविणारा तो पहिला वैज्ञानिक ठरला.
या सुमारास एक गमंतशीर गोष्ट घडली. न्यूटनने टाकसाळीत काम करायला सुरुवात केल्यावर त्याचा आता गणित आणि विज्ञानाची संबंध राहिला नव्हता, त्यामुळे 'न्यूटन आता संपलाय' अशीच सगळ्यांची समजूत झाली होती. पण जॉन बर्नोली या गणिततज्ञाने एक गणितातले अवघड कोडे जगातल्या सर्व गणितीयांना टाकले. न्यूटनने या अतिशय अवघड कोड्याचे उत्तर अवघ्या २ दिवसात सोडवून बर्नोलीकडे पाठवून दिले ते पाहून बर्नोली चाट पडला ' हे कोडे कोण सोडवेल हे मला माहित होते', हे तर मला वाघाचे पंजे दिसतायेत! असे उद्दगार बर्नोलीने काढले होते.
असा हा जगविख्यात संशोधक २० मार्च १७२७ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.